शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर लाखो शिवभक्त दाखल!

रायगड, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा आहे. त्यासाठी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर आले आहेत. या सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच रायगडवर सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://twitter.com/InfoRaigad/status/1798239332849107119?s=19

जिल्हा प्रशासन सज्ज

या सोहळ्यासाठी रायगडवर येणाऱ्या शिवभक्तांची होणारी गर्दी पाहता, रायगड प्रशासनाकडून सोयीस्कर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पार्किंग ठिकाणापासून ये जा करण्यासाठी एसटी बसेस सज्ज करण्यात आल्या आहेत. रायगड परिसरात सुलभ रीतीने फिरता यावे, यासाठी प्रशासनाकडून गडावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच शिवभक्तांच्या मदतीसाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पायरी मार्गावरून जाणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रशिक्षित ट्रेकर्स सज्ज करण्यात आले आहेत.

आपत्काळात रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी रायगडवर डॉक्टर, नर्सेस यांच्यासह रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सर्पदंश, विंचू चावणे यांसारख्या घटना टाळण्यासाठी तसेच शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी सर्पमित्र तैनात करण्यात आले आहेत. राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. या पार्श्वभूमीवर, शिवभक्तांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या उष्णतेचा विचार करता प्रशासनाने रायगडावर जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यांसारख्या अनेक सोयीसुविधा रायगड जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दरवर्षी रायगडावर अनेक राजकीय नेते येत असतात. त्यांच्या सुरक्षेची देखील काळजी प्रशासनाने घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *