मुंबई, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या योजनेतील जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? या विषयी लाभार्थी महिलांमध्ये प्रश्न उपस्थित होत होते. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1879923877679112694?t=sJ-0uieB-Ah0y7c_vuRpXg&s=19
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी 3690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महिलांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत 9 हजार रुपये मिळाले
तत्पूर्वी, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांमध्ये एकूण 9000 रुपये थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याचा हा सातवा हप्ता असून, योजनेनुसार प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. राज्यातील जवळपास 2 कोटी 47 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्यातील महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.