मुंबई, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, सर्व पात्र महिला लाभार्थींना लाभाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लवकरच पैसे मिळणार!
याआधी, एप्रिल महिना संपूनही योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना हप्ता मिळालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. “एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार?” असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मात्र, आदिती तटकरे यांच्या घोषणेमुळे लाभार्थींना येत्या काही दिवसांतच आर्थिक मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत मिळालेला आर्थिक लाभ
महिला व बालविकास विभागाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी स्वरूपात प्रदान केला जातो. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 9 हप्त्यांमध्ये एकूण 13,500 रुपये वितरित करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देणे, तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जून 2024 मध्ये या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वयोगटातील त्या महिलांना मिळतो. परंतु, ज्या महिला योजनेचे सर्व निकष पूर्ण करतात, त्यांनाच या योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना प्रभावी ठरत असून, राज्य शासनाच्या या उपक्रमाला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.