मुंबई, 11 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महायुती सरकार त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात हा हप्ता वाढवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारी (दि.10) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा वाढीव हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे.
सरकारने दिली माहिती
यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, राज्यातील 2.53 कोटी महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाले असून, आगामी 2025-26 आर्थिक वर्षासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.”
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वाढणार?
मात्र, सरकारने यावेळीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता वाढीचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. तसेच विरोधी पक्षांकडून देखील सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारने दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन कधी मिळणार? हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना पडला आहे. याबाबत अनेक महिलांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली असून, सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या केली जात आहे.