मुंबई, 07 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पुढील कालावधीतही सुरू ठेवण्याची राज्य सरकारची भूमिका असून, याबाबत पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे. तसेच या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे, या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.
https://x.com/MahaDGIPR/status/1897712791383048378?t=uNJDWP7RtqK4k7KZVd9z3w&s=19
2100 चा हप्ता कधी होणार?
तत्पूर्वी, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलै 2024 मध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती. त्यावेळी सरकारने या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात नोव्हेंबरमध्ये महायुतीने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. पुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तरी देखील अद्याप लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढविण्यात आलेला नाही. त्यामुळे दिलेल्या आश्वासनानुसार सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा कधी करणार? असा सवाल सातत्याने विरोधकांकडून विचारला जात आहे. तसेच महिलांमध्येही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करावा, अशी अपेक्षा सध्या राज्यातील महिलांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार यासंदर्भातील निर्णय कधी घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
7 तारखेला लाभाचे पैसे मिळणार
दरम्यान, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील हप्ताविषयी माहिती दिली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी वितरित केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी फेब्रुवारी महिन्यात 1500 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे देखील स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै ते जानेवारी या कालावधीत महिला लाभार्थींना सात हप्त्यांमध्ये एकूण 10,500 रुपये मिळाले आहेत.