बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचा ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके’ पुरस्काराने सन्मान

बारामती, 10 जून: (अभिजित कांबळे) बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्रास नवी दिल्ली येथील नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेस आणि धानुका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्वोत्तम विभागीय केव्हीके – अटारी झोन 8’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार 6 जून 2025 रोजी नवी दिल्ली येथील ए. पी. शिंदे कॉन्फरन्स हॉल इंडियन कौन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च याठिकाणी आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.



अटारी झोन 8 मध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांतील एकूण 82 कृषी विज्ञान केंद्रांचा समावेश आहे. या पारितोषिकासाठी केंद्राच्या मागील पाच वर्षांतील कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला होता. हा पुरस्कार केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी स्वीकारला. याप्रसंगी नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चर सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक, उपाध्यक्ष डॉ. बी. एस. धिल्लन, धानुका ग्रुपचे चेअरमन श्री अग्रवाल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.



या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चर सायन्सेसच्या 32 व्या जनरल मीटिंग आणि फाउंडेशन डेच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे, नॅशनल अकॅडमी ऑफ एग्रीकल्चर सायन्सेस ही संस्था गेली 30 वर्षे देशातील कृषी व संबंधित संशोधनाचे मूल्यांकन करीत असून, प्रकाशित संशोधन पत्रिकांचे दर्जात्मक मूल्यमापनही करते.




ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कार्याची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
  • ऊस लागवडीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ज्याचे कौतुक मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही केले आहे.
  • उन्नत पिकांच्या जातींचा प्रसार, कलमी भाजीपाला रोपांची निर्मिती, मूल्यवर्धन साखळी आणि शेतकरी उद्योजकतेसाठी प्रयत्नशीलता.
  • 50 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांची स्थापना आणि मार्गदर्शन.
  • मृदा परीक्षण, जैविक प्रयोगशाळा, फिशरी, मिलेट प्रोसेसिंग युनिट, बियाणे प्रक्रिया, डेअरी, रोपवाटिका अशा विविध सुविधा.
  • वर्षभर प्रशिक्षण, प्रात्यक्षिकं, प्रत्यक्ष भेटी व कृषी प्रदर्शनांचे आयोजन, ज्यामुळे शेतकरी, युवक, विद्यार्थी व अधिकारी यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे उद्योजक निर्मितीला अधिक चालना मिळते.
  • ‘कृषिक’ प्रदर्शनाद्वारे तंत्रज्ञानाच्या थेट प्रसाराचे राष्ट्रीय स्तरावर उदाहरण.
  • धान्य महोत्सव, चैत्र पालवी, खरीप-रब्बी मेळावे, कौशल्य प्रशिक्षण, कृषिक ॲप सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक कार्य.

या गौरवाबद्दल ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे आणि कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, बारामती येथील विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतीत पोहोचत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रयत्नांमुळे आजचा युवक कृषी क्षेत्राकडे नव्या आशेने पाहू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *