कुर्ला बस अपघात; मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

मुंबई, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कुर्ला येथील बेस्ट बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्ट यांनी करावा, असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, कुर्ला परिसरात अनियंत्रित झालेल्या एका बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि लोकांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण जखमी झाले आहेत. काल (दि.09) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

https://x.com/Devendra_Office/status/1866347239964393679?t=_UA4p4_eD0sQ5oLyIxx-hw&s=19

मुख्यमंत्र्यांचे ट्विट

दरम्यान, या बस अपघाताच्या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1866331870025380171?t=5cgHCXvVEkI0-ENI30atlg&s=19

अजित पवारांनी शोक व्यक्त केला

तसेच या अपघाताबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसने अनेक लोकांना चिरडल्याची तसेच या अपघातात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. कुर्ला येथे सोमवारी रात्री भरवस्तीत बेस्ट बसच्या अपघातात बळी पडलेल्या निष्पाप जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची मी विचारपूस केली असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी याकरता प्रार्थना करतो, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. या दुर्घटनेची नेमकी कारणे शोधून यावर योग्य ती कारवाई व उपाययोजना केली जाईल. पण बेस्ट सारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेने अशा दुर्घटना भविष्यात कधीही घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यायला हवी. मृतांना माझी विनम्र श्रद्धांजली, असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *