मुंबई, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कुर्ला बस अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याला येत्या 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात एका बेस्ट बसने काल (दि.09) रात्रीच्या सुमारास अनेक वाहनांना आणि लोकांना चिरडले होते. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या मुंबईतील भाभा, सायन आणि विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
https://x.com/ANI/status/1866433294075879427?t=0NQEr5SBGqevdRKmNA5AVg&s=19
चालकाला पोलीस कोठडी
या अपघातानंतर चालक संजय मोरे याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज (दि.10) कुर्ला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बस चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरपासून बेस्टमध्ये रुजू झाला असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता, असे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
https://x.com/myBESTBus/status/1866445802702512401?t=cjnCLWYCHub0iND0_3P2fA&s=19
दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर
मुंबईतील कुर्ला पश्चिम बसस्थानक ते अंधेरी पूर्व बसस्थानक या मार्गावरून ही बेस्ट बस (क्र. एम एच 01 ईएम 8228) जात होती. मात्र, अचानकपणे चालकाचे या बसवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेल्या या बसने अनेक लोकांना चिरडले. रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईमधील विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती बेस्टने दिली आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये 2 लाख बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात येत आहेत. तसेच जखमीवर औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रमा यांच्या मार्फत केला जाईल, अशी माहिती देखील बेस्टने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.