कुणाल कामराने माफी मागण्यास नकार दिला, पाहा काय म्हणाला?

कुणाल कामराने माफी मागण्यास नकार दिला

मुंबई, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक वादग्रस्त गाणे गायले होते. याप्रकरणी कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या या वादग्रस्त गाण्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मुंबईतील हॅबिटॅट या स्टुडिओची तोडफोड केली. त्यामुळे 19 शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे, कुणाल कामरा याने त्याच्या या वादग्रस्त गाण्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी केले आहे. यामध्ये त्याने त्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

https://x.com/kunalkamra88/status/1904222690803876139?t=ABTZSYAzmXHhlGu4Vgipyw&s=19

काय आहे प्रकरण?

कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक वादग्रस्त गाणे गायले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याने शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांची बदनामी केली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्याने माफी मागण्यास नकार दिला.

कुणाल कामराचे स्टेटमेंट –

“मनोरंजन स्थळ हे केवळ एक व्यासपीठ असते. त्या ठिकाणी सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ते जबाबदार नसते. माझ्या विनोदांसाठी हॅबिटॅट जबाबदार नाही, आणि कोणत्याही राजकीय पक्षाला माझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही,” असे थेट मत प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने व्यक्त केले आहे.

मुंबईतील हॅबिटॅट या कलासंस्कृतीच्या मंचावर काही लोकांनी तोडफोड केली. एका विशिष्ट राजकीय नेत्यावर टीका झाली म्हणून संतप्त जमावाने हल्ला केला, तर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्या ठिकाणी विध्वंस केला. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना कामरा म्हणाला, “एका विनोदावरून संपूर्ण स्थळ उद्ध्वस्त करणे म्हणजे बटर चिकन चांगले लागले नाही म्हणून टोमॅटोने भरलेला ट्रक उलथवण्यासारखे आहे!”

राजकीय नेत्यांनी धमक्या देणे आणि धडा शिकवण्याची भाषा वापरणे हे लोकशाहीला शोभणारे नाही, असे स्पष्ट करताना कामरा म्हणाला, “आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ श्रीमंत आणि शक्तिशाली स्तुतीगान करण्यासाठी नाही. सार्वजनिक व्यक्तीची खिल्ली उडवण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. मला माहीत आहे त्यानुसार, आमच्या नेत्यांची आणि आमच्या राजकीय व्यवस्थेच्या तमाशाची खिल्ली उडवणे बेकायदेशीर नाही. तथापि, माझ्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, तोडफोड करणाऱ्या गुंडांवरही कायदा तितकाच कठोर असेल का?”

त्या सर्वांवर समान कायदा लागू होईल?

पण ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यामुळे तोडफोड करणे योग्य ठरवले, त्यांच्यावर आणि बीएमसीच्या निवडून न आलेल्या सदस्यांवर कायदा योग्य आणि समान रीतीने लागू होईल का? जे आज हॅबिटॅट येथे पूर्वसूचना न देता आले आणि त्यांनी हातोड्यांनी जागा तोडली. कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फिन्स्टन पूल किंवा मुंबईतील इतर कोणतीही रचना निवडेल, ज्याला त्वरित पाडण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्याने टोला लगावला.

तुम्हाला तेच गाणे ऐकायला मिळेल

पुढे कुणाल कामरा म्हणाला, “जे माझा नंबर लीक करण्यात किंवा मला सतत कॉल करण्यात व्यस्त आहेत, मला खात्री आहे की तुम्हाला आतापर्यंत कळले असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉईसमेलवर जातात, जिथे तुम्हाला तेच गाणे ऐकायला मिळेल जे तुम्हाला आवडत नाही.”

“मी माफी मागणार नाही!”

या तमाशाचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनी लक्षात ठेवा की भारतात प्रेस स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे. असे तो यामध्ये म्हणाला. सोबतच कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास नकार दिला. मी माफी मागणार नाही. मी जे बोललो तेच पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते, असा दावा त्याने केला आहे. तसेच मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे प्रकरण शांत होण्याची वाट पहात माझ्या अंथरुणाखाली लपून बसणार नाही, असेही त्याने आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *