बारामती, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान ‘कृषिक’ या भव्य कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बारामती तालुक्यातील मळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एडीटीचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, कृषिक प्रदर्शनाचे यंदा नववे वर्ष आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1877024115741032529?t=8mZekScqzYdp4Kjh5gq8Sw&s=19
अनेक मान्यवर सहभागी होणार
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण राज्याच्या पर्यावरण व पशू संवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि पशू संवर्धन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांना दिले आहे. हे सर्व मान्यवर या प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत, असे रोहित पवारांनी सांगितले आहे. तसेच हे प्रदर्शन शेतकरी, व्यवसायिक, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी उद्योगातील व्यावसायिक यांच्यासाठी खुले असणार आहे.
शेतकऱ्यांसाठी लाभ
‘कृषिक’ प्रदर्शन हे कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती, खतांचे प्रकार, नवीन पीक तंत्रज्ञान यांसारखी प्रात्यक्षिके सादर केली जातील. तसेच याठिकाणी विविध कृषी उत्पादनांचे स्टॉल्स असणार आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांना विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, भरडधान्य पिकांच्या जाती पाहता येणार आहेत. तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि भविष्यातील शेतीविषयक तंत्रज्ञान पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींचा उपयोग करून शेतीत कशी प्रगती साधता येईल? याची माहिती देखील प्राप्त होणार आहे.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक बी बियाणे, खते, नवनवीन तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, अवजारे, पशुपालन, जल व्यवस्थापन, आणि इतर कृषी क्षेत्राशी संबंधित उपक्रम पाहता येतील. तसेच यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती सुधारण्यासाठी मदत मिळणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची शेतीविषयक यंत्रसामुग्री, सेंद्रिय खते, आणि नवनवीन पीक पद्धतींबाबतची माहिती देण्यात येईल. कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील देश-विदेशातील कंपन्यांचा सहभाग असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर घालावी, असे आवाहन करण्यात आले आहे.