बारामती, 19 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ‘कृषिक 2025’ या प्रदर्शनाला 18 जानेवारी रोजी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातील शेतकऱ्यांसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा आणि कनार्टक येथूनही हजारो शेतकरी प्रदर्शनासाठी आले होते. यामध्ये युवावर्ग आणि महिलांचा देखील मोठा सहभाग होता. शेतकऱ्यांनी सकाळपासूनच प्रदर्शनस्थळी येऊन विविध तंत्रज्ञान आणि शेतीच्या पद्धतींची पाहणी केली.
https://www.facebook.com/share/p/1XZWKHZqEM/
कृषी विषयक तंत्रज्ञान
कृषिक 2025 प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणांमध्ये माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब, पेरू, शेवगा आणि परदेशी भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या तंत्रज्ञानाची पाहणी केली आणि त्याची माहिती घेतली.
पशुधनासाठी स्वतंत्र दालन
यंदाच्या कृषिक 2025 प्रदर्शनात पशुप्रदर्शनासाठी एक स्वतंत्र दालन सजवले गेले आहे. यामध्ये देशी आणि विदेशी पशुधनाची प्रात्यक्षिके पाहावयास मिळत आहेत. या पशुप्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे, शिंदे डेअरीचा दीड टनांचा रेडा आणि बन्नुर जातीच्या मेंढ्या. शिंदे डेअरीचा रेडा त्याच्या आकारामुळे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, तर बन्नुर जातीच्या मेंढ्यांनी देखील शेतकऱ्यांना आकर्षित केले, कारण ह्या जातीच्या मेंढ्यांची विशेषत: उत्पादनक्षमतेच्या बाबतीत अधिक फायदे देतात.
विविध पशूंच्या स्पर्धा
यावेळी प्रदर्शनात पशूंच्या विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये डॉग शो, कालवड स्पर्धा, तसेच दुग्धोत्पादन स्पर्धांचा समावेश होता. डॉग शोमध्ये विविध जातींचे श्वान आणि कालवड स्पर्धेमध्ये खिलार वळू, लाल खंदारी वळू, गायी यांचा सहभाग होता. क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक यांद्वारे या स्पर्धांचे परीक्षण केले जात आहे. स्पर्धेचा निकाल 20 जानेवारी रोजी जाहीर केला जाईल. तसेच संकरीत गाईंची दुग्धोत्पादन स्पर्धा उद्यापर्यंत सुरू राहील.
प्रशिक्षण आणि माहिती
‘कृषिक 2025’ प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्राने विविध प्रशिक्षणांचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये मातीचे आरोग्य, जलसंधारण, हवामान आधारित शेती, आणि पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यातील प्रशिक्षणांची माहिती घेतली आणि नाव नोंदणी केली आहे. याशिवाय, पिकांच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची कंपन्यांच्या स्टॉलला मोठी गर्दी होती. स्टॉलवर शेतकऱ्यांना पिकांच्या वाणांचे फायदे आणि तंत्रज्ञान समजावून सांगितले जात होते, ज्यामुळे त्यांना योग्य निवडी करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिक 2025 या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आयोजकांचे आवाहन आहे.