मुंबई, 18 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने माळेगाव खुर्द येथे ‘कृषिक 2025’ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कृषी विषयक प्रदर्शन 16 ते 20 जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. या प्रदर्शनाला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.
https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1880411272635904401?t=y1H8ljygMLlENPgHPxXwCQ&s=19
कृषिक 2025 प्रदर्शन
या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील विविध नवे तंत्रज्ञान आणि त्यांची प्रात्यक्षिके दाखवले जात आहेत. यासोबतच, या प्रदर्शनात विविध प्रकारचे पशुधन पहावयास मिळत आहे, ज्यामध्ये दुर्मिळ घोडे, बैल आणि मेंढ्यांसह इतर विविध प्रकारच्या जनावरे पाहण्यास मिळत आहेत. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, त्यांनी हे प्रदर्शन बघायला हवं, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी कृषिक 2025 पाहण्याचे आवाहन केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण पशुधन
कृषिक 2025 प्रदर्शनात प्रमुख आकर्षणांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पशुधन होते, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. या प्रदर्शनात 11 कोटी रुपये किमतीचा मारवाडी घोडा, हैदराबादचे नवाब हसन बिनत्रिफ यांचा घोडा, 1 कोटी किमतीचा 1500 किलो वजनाचा ‘कमांडो’ रेडा, 1 कोटी रुपये किमतीच्या रामा आणि रावण नावाच्या लाल कंधारी बैलांच्या जोडी, दुर्मिळ बन्नूर जातीच्या मेंढ्या यांसारखे दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण पशुधन यावेळी अनिल देशमुख यांनी पाहिले.
कापूस वेचणी मशीनचे प्रात्यक्षिक
यासोबतच अनिल देशमुख यांनी कृषिक 2025 प्रदर्शनात कापूस वेचणी मशीनच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. अर्ध्या तासात 1 एकर कापूस वेचणारे हे यंत्र शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्याला एक उत्तम उपाय ठरेल, अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, विदर्भातील कापूस पिकासमोरील समस्येवर एक उपाय म्हणून शक्तिमान कंपनीने कापूस वेचणी मशीन तयार केले आहे. या मशीनचे कृषिक 2025 प्रदर्शनात प्रात्यक्षिक दाखवून त्याची माहिती दिली जात आहे.
शेती पिकांच्या वाणांची पाहणी
त्याचप्रमाणे, अनिल देशमुख यांनी या कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या शेती पिकांच्या वाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पिकांच्या वाणाचा उपयोग, त्याचे फायदे आणि शेतकऱ्यांसाठी त्याच्या उत्पादनक्षमतेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी तज्ञांकडून सखोल माहिती घेतली. हे वाण कशाप्रकारे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देऊ शकतात? त्यात कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? आणि त्यासाठी योग्य काळजी कशी घेता येईल? याबाबत त्यांनी तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.