चेन्नई, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल स्पर्धेच्या ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. कोलकाताने 2012 आणि 2014 नंतर तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यासमोर 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकात्याने 114 धावांचे हे लक्ष्य 10.3 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले.
https://twitter.com/IPL/status/1794774529916674417?s=19
https://twitter.com/IPL/status/1794774247933718982?s=19
कोलकात्याची भेदक गोलंदाजी
तत्पूर्वी, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा हा निर्णय हैदराबादच्या संघावर उलटला. या सामन्यात देखील हैदराबादची सलामीची जोडी चालली नाही. यावेळी त्यांचे सलामीवीर अभिषेक शर्मा (2) आणि ट्रेविस हेड (0) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर राहुल त्रिपाठी देखील खराब फटका मारून बाद झाला. यावेळी 21 धावांवर हैदराबादच्या 3 विकेट पडल्या होत्या. कोलकात्याच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. या सामन्यात हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 24 धावा केल्या. तर एडन मार्करामने 20, नितीश रेड्डीने 13 आणि हेनरिक क्लासेनने 16 धावा केल्या. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संपुर्ण संघ 18.3 षटकांत 113 धावांत बाद झाला. या सामन्यात कोलकातातर्फे आंद्रे रसेल 3, मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2, तर वैभव अरोरा आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
https://twitter.com/IPL/status/1794776214789648650?s=19
व्यंकटेश अय्यरचे शानदार अर्धशतक
या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाची धावसंख्या 11 असताना त्यांचा सुनील नारायण 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाज आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी 91 धावांची भागीदारी करून विजय जवळ आणून दिला. मात्र विजयासाठी काही धावा शिल्लक असताना रहमानउल्ला गुरबाज बाद झाला. तो बाद झाल्यावर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी राहिलेल्या धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत शानदार नाबाद 52 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यर 6 धावांवर नाबाद राहिला.