मुंबई, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कोलकाता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरल्यानंतर कोलकात्याच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि बीएनएसच्या 3 कलमांतर्गत 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
https://x.com/ANI/status/1881271083304964455?t=UXg5gAW3vRNw4kBgZmVL0g&s=19
https://x.com/ANI/status/1881273895636103376?t=r_R2J69rH9brD3Q29mfM0A&s=19
आर्थिक मदत देण्याचे कोर्टाचे आदेश
यासोबतच या मुलीच्या पीडित कुटुंबाला 17 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी (दि.20) निकाल दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. सीबीआयने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला
9 ऑगस्ट 2024 रोजी आर.जी. कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार व खून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली. या घटनेच्या निषेधार्थ देशातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. तसेच या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून घटनेच्या दुसऱ्या दिवशी, 10 ऑगस्ट रोजी आरोपी संजय रॉय याला अटक केली. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
59 दिवसांनी खटल्याचा निकाल जाहीर
सीबीआयने या प्रकरणात आरोपी संजय रॉय विरोधात बलात्कार व खूनाचे आरोप दाखल केले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी खटला सुरू झाला आणि 9 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने या खटल्याची सुनावणी पूर्ण केली. न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी 18 जानेवारी रोजी रॉय यांना दोषी ठरवले होते. हा खटला सुरू झाल्यानंतर 59 दिवसांनी या आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून देशातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात कठोर कायदे करण्याची गरज आहे.