अहमदाबाद, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. त्याबरोबर कोलकात्याने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविण्यात आला. दरम्यान, हैदराबादला दुसरा क्वालिफायर सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकात्याने श्रेयस अय्यरच्या नाबाद 58 धावा आणि वेंकटेश अय्यरच्या नाबाद 51 धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांचे हे आव्हान 13.4 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.
https://twitter.com/IPL/status/1792967267984257416?s=19
https://twitter.com/IPL/status/1792967425337749676?s=19
हैदराबादचे 160 धावांचे लक्ष्य
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही. यावेळी हैदराबादचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 159 धावांत बाद झाला. यामध्ये हैदराबाद संघाकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 53 धावा केल्या. सोबतच हेनरिक क्लासेनने 32, पॅट कमिन्सने 30 आणि अब्दुल समदने 16 धावा केल्या. याशिवाय त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. यामध्ये त्यांचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही आणि अभिषेक शर्माने केवळ 3 धावा केल्या. तर दुसरीकडे या सामन्यात कोलकाता संघाकडून मिचेल स्टार्कने 34 धावांत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसेच वरूण चक्रवर्तीने 2 आणि वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रेयस – व्यंकटेश यांची नाबाद भागीदारी
त्यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सुनील नारायण आणि रहमानउल्ला गुरबाज या सलामीच्या जोडीने चांगली सुरूवात करीत 44 धावांची सलामी दिली. यावेळी रहमानउल्ला गुरबाजला 14 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. तर सुनील नारायण देखील 16 चेंडूत 21 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने नाबाद 97 धावांची भागीदारी करीत कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. यावेळी श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 58 धावा आणि व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ 26 मे रोजी आयपीएलच्या फायनलमध्ये खेळणार आहे.