मुंबई, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र सरकारने खो-खो विश्वचषक 2025 साठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शासनाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. खो-खो विश्वचषकाचे आयोजन खो-खो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत पार पडणार आहे. विविध देशांच्या संघांचा सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य असेल.
https://x.com/MahaDGIPR/status/1878443987348107380?t=ws8liAQpDY3PYMRVDnsbiw&s=19
महाराष्ट्र शासनाचा निर्णय
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे गेल्या काही दिवसांपासून विचारधीन होती. या मागणीला मान्यता देत महाराष्ट्र सरकारने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सरकारने विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या या निधीमुळे खो-खो विश्वचषकासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारच्या या पावलामुळे भारतीय खो-खोच्या विकासाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
मंजूर निधीविषयक महत्त्वाच्या अटी:
दरम्यान, मंजूर करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत.
1. हा निधी फक्त स्पर्धा आयोजनासाठीच वापरला जाईल.
2. स्पर्धा झाल्यानंतर उरलेला निधी शासनाला परत करावा लागेल.
3. स्पर्धा संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत खर्चाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.
4. सरकारने दिलेल्या पैशाचा खर्च कसा झाला, याची सविस्तर माहिती सरकारला दाखवायला हवी.
5. जर खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाला या स्पर्धेसाठी इतर प्रायोजक, कॉर्पोरेट क्षेत्र किंवा अन्य स्त्रोतांकडून निधी मिळाला, तर तो आणि राज्य शासनाने दिलेला निधी एकत्र विचारात घेतला जाईल. स्पर्धेचा एकूण खर्च यापेक्षा कमी असल्यास उरलेली रक्कम फेडरेशनने शासनाला परत करणे बंधनकारक असेल.