खेड शिवापूर, 22 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान, पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर सोमवारी (दि.21) रात्री कोट्यवधी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. राजगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही रक्कम मोजण्याचे काम सुरू होते. ही रक्कम 5 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1848565437698871540?t=KC7dc3ptDfHw8XjItc11iA&s=19
चार जणांची चौकशी
राजगड पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाकाबंदीदरम्यान ही रोख रक्कम जप्त केली. यावेळी चार जण एका कारमधून 5 कोटी रुपयांची रक्कम घेऊन जात होते. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी त्यांची कार जप्त केली. त्यानंतर राजगड पोलीस ठाण्यात निवडणूक आयोग आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. जप्त करण्यात आलेली ही रक्कम आता अधिक तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे, याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, जप्त केलेली ही रक्कम कोणाची आहे? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
‘काय झाडी काय डोंगर’ – संजय राऊत
तर दुसरीकडे, या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता!” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.