काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, 24 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण घटनेनंतर संपूर्ण देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर असून, सर्वत्र पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

https://x.com/CMOMaharashtra/status/1915249919499141368?t=pZWtnqmP_ozuU0e4rhGO6w&s=19

183 प्रवासी राज्यात परतणार!

या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार आज (24 एप्रिल) दोन विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. एअर इंडियाच्या विमानातून 100 तर इंडिगोच्या विमानातून 83 पर्यटकांना परत आणले जाणार आहे. एकूण 183 पर्यटक आज सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने आज दिली आहे.

विमानसेवेचा खर्च राज्य सरकार करणार

या विमानसेवेचा संपूर्ण खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन कोणतीही तडजोड करणार नाही, असा स्पष्ट संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे. या कामात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही मोलाची साथ लाभली असून, त्यांनी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.

राज्य सरकारकडून प्रवाशांची यादी जाहीर

दरम्यान, राज्य सरकारकडून या प्रवाशांची यादी देखील जाहीर करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत की, मुंबई विमानतळावर सर्व प्रवाशांना आवश्यक ती वैद्यकीय व मानसिक मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी. पर्यटकांच्या नातेवाईकांनी सरकारच्या या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले असून, अशा संकटाच्या काळात शासनाने दिलेला विश्वास नागरिकांच्या मनात दिलासा निर्माण करणारा ठरतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *