कऱ्हा नदी पात्रातील पाणी वाढणार; खबरदारीच्या सूचना

बारामती, 16 ऑगस्टः बारामती शहरासह तालुक्यातून कऱ्हा नदी वाहते. कऱ्हा नदी पात्रात वर्षभर कमी विसर्ग राहतो, यामुळे नदीत पाण्याचे प्रमाण खूप कमी राहते. मात्र ज्यावेळी नदीत पात्रात पाणी सोडले जाते त्यावेळी कऱ्हा नदी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही मोठी राहते. आता अशी बघ्यांची गर्दी लवकरच नदीकाठी पाहण्यास मिळणार आहे. नाझरे धरण जलाशय पातळी आज, 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 च्या सुमारास 676.93 मी. आणि एकूण पाणीसाठा 21.961 दलघमी म्हणजे 98 टक्के इतका झाला आहे. यामुळे नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू आहे.

मुर्टीत माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येव्याचा दर पाहता येत्या 6 ते 7 तासांत प्रकल्पातील पाणीसाठा 100 टक्के होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याच्या येव्या नुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत विसर्ग सुरु होऊ शकतो. त्यामुळे कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत, अशा सूचना नाझरे धरण शाखेच्या शाखाधिकाऱ्यांकडून नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *