“कारभारी जिमखाना” ला बारामती नगरपरिषदेचा मोठा दणका!

बारामती नगरपरिषद ऑनलाईन कर भरणा

बारामती, 07 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती नगरपरिषदेने धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या ठेकेदाराला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील “कारभारी जिमखाना” नावाचे होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन झाले नाही तर, दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे बारामती नगरपरिषदेने या आदेशात म्हटले आहे.

यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे आणि बारामती शहराध्यक्ष अभिजित कांबळे, भाजपचे ॲड. अक्षय गायकवाड, अमर भंडारे, गणेश जाधव, मोहन शिंदे, सुमित सोनवणे, इंद्रजित साळवे, सूरज मोरे, सचिन शिंदे, निलेश शेंडगे, विनोद काळे, किरण नागे आदी स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि बारामती शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन दिले होते. त्यांच्या या मागणीची दखल नगरपरिषदेने घेतली आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागणीला मोठे यश आल्याचे दिसून येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

बारामतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे देखभाल दुरूस्तीसाठी आणि क्रिकेट अकादमी चालवण्यासाठी धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. मात्र, या ठेकेदाराने स्टेडियमच्या दर्शनी भागात “कारभारी जिमखाना” नावाचे भलेमोठे होर्डिंग लावले आहे. त्यासाठी या ठेकेदाराने नगरपरिषदेची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान, या होर्डिंगद्वारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कमी लेखण्याचा जातीवादी हेतू असल्याचा आरोप स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता.

कारभारी जिमखाना होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आदेश!

यासंदर्भात रविंद्र सोनवणे आणि अभिजित कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी बारामती नगरपरिषद आणि पोलीस विभागाला निवेदन दिले होते. यामध्ये त्यांनी धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या चालक-मालक यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि झालेला करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच यासंदर्भात कारवाई झाली नाही तर, आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार, बारामती नगर परिषदेने धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या ठेकेदाराला नोटीस बजावत “कारभारी जिमखाना” नावाचे होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

नगरपरिषदेचे आदेश –
1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे अधिकृत नाव बदलणे योग्य नाही आणि यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
2. कराराच्या कागदपत्रांमध्ये “कारभारी जिमखाना” नावाचा कुठेही उल्लेख नाही.
3. “कारभारी जिमखाना” लावलेले होर्डिंग्ज तात्काळ काढून टाका आणि त्याची माहिती नगरपरिषदेला लेखी स्वरूपात द्या.
4. जर हे आदेश पाळले नाहीत, तर करारातील अटींनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
5. भविष्यात कोणतेही नवीन काम नगरपरिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय सुरू करता येणार नाही. असे बारामती नगरपरिषदेने या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *