कल्याण, 13 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी असलेल्या विशाल गवळीने तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी (दि.13 एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास टॉवेलच्या सहाय्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती तळोजा जेल प्रशासनाने दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी विशाल गवळी मागील साडेतीन महिन्यांपासून तळोजा कारागृहात कैद होता.
https://x.com/ANI/status/1911292200077434993?t=y3EFLYG7d3VpEMnG_ZUAcw&s=19
काय होते प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी याने 22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या पत्नीच्या मदतीने कल्याण परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह कल्याणजवळील निर्जनस्थळी आढळून आला. तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात पोलिसांनी प्रथम विशाल गवळीच्या पत्नीला अटक केली होती. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली होती. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. समाज माध्यमांवरून विशाल गवळीला फाशी देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.
पोलीस तपास सुरू
मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी विशाल गवळी याने आज (दि.13) पहाटे तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणी अधिक तपास तळोजा कारागृह प्रशासन आणि स्थानिक पोलीस करत आहेत.