कल्याण, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कल्याण परिसरात काही दिवसांपूर्वी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज (3 जानेवारी) पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी याप्रसंगी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. या प्रकरणातील आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी म्हटले आहे.
https://x.com/RamdasAthawale/status/1875149621627863483?t=mAsNz7gVwlKi5UJ22b-lPA&s=19
याप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. विशाल गवळी याने 22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. परंतु, दुसऱ्या दिवशी या मुलीचा मृतदेह कल्याण परिसरातील निर्जनस्थळी आढळला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती, हे तपासात समोर आले.
आरोपींना पोलीस कोठडी
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीच्या या दुष्कर्माचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम विशाल गवळी याच्या पत्नीला अटक केली आणि त्यांनी नंतर विशाल गवळीला शेगाव येथे अटक केली. सध्या या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या हे आरोपी पती पत्नी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलीस चौकशी केली जात आहे.
महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित
या घटनेवरून समाजात महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. विशेषत: महिलांच्या आणि मुलींच्या संरक्षणासाठी सरकारने अधिक कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मानले जात आहे. या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेतील नराधम विशाल गवळी याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाज माध्यमातून केली जात आहे.