ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर, अजित पवारांकडून आनंद व्यक्त

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

मुंबई, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव राज्याच्या विधानसभेत सोमवारी (दि.24) एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव ऐतिहासिक असून महाराष्ट्राच्या प्रगत, पुरोगामी आणि सुधारणावादी विचारसरणीला अधिक बळकटी देणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1904087707556425919?t=rs4IY4BlpX1J6ap7pzblZw&s=19

अजित पवारांकडून आनंद व्यक्त

यासंदर्भात आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये अजित पवारांनी या ठरावास संमती देणाऱ्या सर्व विधिमंडळ सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली.”

“आज शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाला आहे.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

“दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दांपत्याने केलेलं कार्य अलौकिक आहे. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत,” असेही अजित पवार यांनी म्हटले. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटद्वारे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *