मुंबई, 09 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस उलटले आहे. तरी देखील महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत काही जागांसाठी वाद असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज महाविकास आघाडीची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1777184193640050830?s=19
सांगलीच्या जागेवरून वाद?
आजच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत हे नेते जागा वाटपाची माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे सांगली मतदार संघाच्या जागेवर काँग्रेस पक्ष उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवर काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज दिली. राज्यातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच हा साडेतीन मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त निवडण्यात आला असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राज्यात 35 हून अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.