जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवले; जितेंद्र आव्हाड यांनी फाडला बाबासाहेबांचा फोटो, सर्वत्र संतापाची लाट

महाड, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव एससीईआरटीने मांडला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र – पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृतीचे दहन आंदोलन करण्यात आले. परंतु त्यावेळी मनुस्मृती पुस्तक फाडत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला गेला. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1795742584658407492?s=19

फौजदारी कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे. आव्हाडांच्या आंदोलनात कचरा फेकावा तशी बाबासाहेबांची प्रतिमा फाडून फेकण्यात आली. असं आंदोलन करून जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत, त्यामुळे ते देशातील सामाजिक स्थिती बिघडवण्याला जबाबदार ठरत आहेत. त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून अटक करावी आणि शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1795778328227659925?s=19

अमोल मिटकरी काय म्हणाले?

तर यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाड यांनी पवित्रभूमी महाड येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याची अक्षम्य चूक केली आहे. हा बाबासाहेबांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. या कृत्यासाठी आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांनी 24 तासांच्या आत माफी मागितली नाही किंवा महाड येथे बाबासाहेबांच्या पायावर नाक घासून प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन केलं जाईल,” असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

https://twitter.com/VBAforIndia/status/1795759573170880726?s=19

वंचितकडून निषेध

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. “आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृती संपेल. जर मनात मनुस्मृती आहे तर ती कृतीत उतरते आणि अशा गोष्टीं होतात. जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा जाहीर निषेध आम्ही करतो!” असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *