छत्रपती संभाजीनगर, 16 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील छत्रपती संभाजीनगर परिसरात निवडणूक आयोगाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईत त्यांनी एका वाहनातून सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या दागिन्यांची किंमत 19 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने ही कारवाई केली. याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.15) दिली.
19 किलो सोने आणि 37 किलो चांदी
राज्यात येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान सिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर असलेल्या निल्लोड फाटा परिसरात एसएसटी पथकाने एका चारचाकी वाहनातून 19 किलो सोने आणि 37 किलो चांदी जप्त केली. या सोन्याचांदीच्या दागिन्यांची किंमत 19 कोटी रुपये आहे. जप्त केलेले दागिने सिल्लोड शहर पोलिसांनी जीएसटी विभागाकडे सुपूर्द केले आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
546 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 ऑक्टोंबर रोजी आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत राज्यात 15 ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.