अंतरवाली सराटी , 04 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.04) विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. एकाच जातीवर निवडणुकीत विजय मिळवणे शक्य नाही, त्यामुळे आपल्याला ही निवडणूक लढवायची नाही. अशा परिस्थितीत मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच मित्र पक्षांची यादी आम्हाला मिळाली नसल्याने आम्ही विधानसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. त्याचवेळी मनोज जरांगे यांनी येत्या काळात मराठा आरक्षण लढा सुरूच राहणार असल्याची घोषणा देखील केली.
https://x.com/ANI/status/1853398073688621508?t=d2sNij58c-4inexFdeVA3g&s=19
आमचा कोणाला पाठिंबा नाही
विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत काल रात्री आमची बरेच तास सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही. कोणत्याही अपक्ष उमेदवाराला आणि कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही, तसेच कोणाच्या दबावाखाली आम्ही हा निर्णय घेतलेला नाही, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
आधी निवडणूक लढविण्याची घोषणा
तत्पूर्वी, मनोज मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.03) विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जरांगे पाटील यांनी काही जागांवर उमेदवार उभे केले होते. तर त्यांनी काही जागांवरील उमेदवारांना पडण्याची घोषणा केली होती. तसेच काही उमेदवारांना मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (दि.04) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. जरांगे पाटलांच्या या अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांनी हा निर्णय का घेतला असावा? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.