जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

दिल्ली, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांची आज अचानकपणे प्रकृती बिघडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर जरांगे पाटील प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.

जरांगे पाटलांना अशक्तपणा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अशातच राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशा परिस्थितीत रोजचे दौरे, झोप न होणे, वेळेवर जेवण न करणे तसेच वातावरणात झालेला बदल यांसारख्या त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटलांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे म्हटले जात आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याने जरांगे पाटलांना राज्याचा दौरा मधूनच सोडावा लागला आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांना उपोषणामुळे प्रकृती बिघडल्यानंतर याच्या आधी देखील छत्रपती संभाजीनगर मधील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुन्हा उपोषणाला बसणार

मनोज जरांगे पाटील हे सगे सोयाऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी आपण येत्या 4 जून रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील 4 जून रोजीच लागणार आहे. या दिवशीच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. अशा स्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण करणार का? तसेच राज्यात सगे सोयरे कायदा लागू होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *