पाणी पिणे सोडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना, 01 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच मराठा आरक्षण संदर्भातील कायदेशीर बाबींवर काम करण्यासाठी राज्य सरकारला थोडा वेळ लागणार आहे, त्यासाठी मराठा समाजाने आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या या आवाहनानंतर जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे, सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किती दिवस लागणार? हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे. सरकार महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण का देत नाही? राज्य सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मी सर्व नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा आणि जर हा निर्णय आज निर्णय घेतला नाही, तर मी आज सायंकाळपासून पाणी पिणे सोडणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेत्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे या बैठकीतून पाहायला मिळाले. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आम्हाला वेळ वाढवून द्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात सध्या हिंसक घटना घडत आहे, त्यामुळे या आंदोलनाला गालबोट लागले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मंत्रालयाच्या दारात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन

One Comment on “पाणी पिणे सोडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *