बारामतीत रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा जनसन्मान महामेळावा

बारामती, 11 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती शहरातील टीसी कॉलेज शेजारील मिशन हायस्कूल ग्राउंडवर रविवार दि. 14 जुलै रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी पक्षाचा जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, सहकारी संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, सोसायटी, बचत गट, ग्रामपंचायत व पक्ष संघटनेतील सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम, खासदार सुनेत्रा पवार, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचे हे वरिष्ठ नेते सभेच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे बारामती तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या महामेळाव्याला उपस्थितीत राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *