पुणे, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथील परधाडे रेल्वेस्थानकाजवळ आज (दि.22) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याचा संशय आल्यामुळे काही प्रवाशांनी घाबरून रेल्वेतून उडी घेतली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत आणि काही प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.
https://x.com/ANI/status/1882043767701770438?t=2TjAIJCtrxfWZeJaZNDUOQ&s=19
https://x.com/PTI_News/status/1882048693001748850?t=8LRRcciz-O33vP8qLEOTOg&s=19
आग लागल्याच्या अफवेमुळे अपघात
पुष्पक एक्सप्रेसमधून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून आगीच्या थोड्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर या रेल्वेला आग लागल्याची खोटी अफवा पसरली. या अफवेमुळे प्रवाशांना आग लागल्याचा भास झाला आणि त्यांच्यात घबराट पसरली. या भीतीमुळे काही प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारली. मात्र, याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्या प्रवाशांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 7 ते 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बचावकार्य सुरू
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे प्रशासन, पोलीस, सुरक्षा दल आणि बचावकार्य करणारी पथके पोहोचली आहेत. तपास सुरू असून, अधिकृत माहिती मिळविण्याचे काम चालू आहे. दरम्यान, रेल्वे अपघाताच्या या घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांवर शोक व्यक्त केला जात आहे, तसेच जखमींच्या प्रकृतीवर सध्या प्रशासनाचे लक्ष आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे प्रशासन या गंभीर घटनेचा सखोल तपास करत आहे. तर भविष्यकाळात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.