जय शाह यांनी ICC च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली

दिल्ली, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बीसीसीआय चे माजी सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे नवे अध्यक्ष बनले आहेत. जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. त्यामुळे जय शाह हे आता ग्रेग बार्कले यांची जागा घेणार आहेत. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणारे जय शाह हे पाचवे भारतीय व्यक्ती बनले आहेत. दरम्यान, ऑगस्ट 2024 मध्ये जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

https://x.com/ICC/status/1863116353005093028?t=6azE9difI_YnGnQ2G7Hzyw&s=19

ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी

आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जय शाह यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. आयसीसी अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारताना मला सन्मान वाटतो आणि आयसीसी संचालक आणि सदस्य मंडळांच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी करत आहोत. तसेच अनेक फॉरमॅटचे सहअस्तित्व आणि महिलांच्या खेळाच्या वाढीला गती देण्याची गरज यासह आम्ही एका निर्णायक टप्प्यावर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

ग्रेग बार्कले यांचे आभार

क्रिकेटमध्ये जागतिक स्तरावर नेण्याची अफाट क्षमता आहे. या संधींचा फायदा घेण्यासाठी आणि खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी मी आयसीसी संघ आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जय शाह यांनी गेली चार वर्षे आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ग्रेग बार्कले यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. मी ग्रेग बार्कले यांचे गेल्या चार वर्षात या पदावर असलेल्या नेतृत्वाबद्दल आणि या काळात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानू इच्छितो, असे जय शाह यांनी म्हटले आहे.

जय शाह यांची कारकीर्द

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत. जय शाह यांनी 2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून आपला प्रवास सुरू केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या विकासावर देखरेख केली. त्यानंतर 2019 मध्ये जय शाह हे बीसीसीआय मध्ये सामील झाले. त्यावेळी त्यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ते बीसीसीआयचे सर्वात तरूण सचिव बनले होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *