बारामती, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादळी पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती शहरासह तालुक्यात देखील मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस पडत आहे. या जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे बारामती शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडल्या आहेत. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. त्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच बारामती शहरात गुरूवारी (दि.23) झालेल्या पावसाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. काल रात्री झालेल्या पावसात बारामती शहरातील कृषी उत्पादन बाजार समितीच्या शेजारील पेट्रोल पंपावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ –
https://youtube.com/shorts/wtxqGDdUhyY?si=gGlSbLlWiU_jRL9q
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बारामतीमधील कृषी उत्पादन बाजार समितीच्या शेजारील पेट्रोल पंपाच्या स्टोरेज टाकीवर अचानकपणे वीज कोसळली. ही घटना काल रात्री उशीरा घडली. त्यामुळे यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक तसेच येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याठिकाणी वीज कोसळल्यामुळे आग लागली होती. या आगीच्या घटनेची माहिती बारामती नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले तसेच ही आग आटोक्यात आणली.
या घटनेमुळे वित्तहानी झाली
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, याठिकाणी वित्तीयहानी झाल्याचे वृत्त आहे. या आगीमुळे पेट्रोल पंपाच्या टाकीमधील डिझेल पुर्णपणे संपले होते. दरम्यान, बारामतीमधील कृषी बाजार समिती शेजारील सदर पेट्रोल पंप हा खरेदी विक्री संघाचा आहे. या घटनेनंतर बारामती नगर परिषदेच्या अग्निशामक खाते प्रमुख कुलरवार आणि फायरमन मोहन शिंदे, फायरमन निखिल कागडा, मदतनीस सदा वाघमारे उपस्थित होते.