शेतकऱ्यांनी शेतीमाल कृऊबासमध्ये ई-नाम प्रणाली अंतर्गत विकणे फायदेशीर

बारामती, 07 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषि बाजार ई-नाम योजनेमध्ये बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची दुसऱ्या टप्प्यात निवड झाली आहे. त्या अनुषंगाने शेतकरी, आडते, व्यापारी व कर्मचारी यांना ई-नाम संदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी दि. 07 ऑगस्ट 2024 रोजी ई-नाम कार्यप्रणालीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीतील मुख्य कार्यालयाचे अजित सभागृहात पार पडले. यावेळी भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ई-नाम विभागाचे मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.



यावेळी उपस्थितींना एलसीडी स्क्रीन वर संपुर्ण ई-नाम प्रणालीची माहिती देण्यात आली. ई-नाम राष्ट्रीय बाजारद्वारे बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना वेळेत शेतमालाचे ऑनलाईन पेमेंट मिळणार आहे.



ई-नाम मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे. शेतमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे तात्काळ पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात गावांतील शेतकरी आणि उत्पादक कंपनी यांना शेतमालाला राष्ट्रीय स्तरावर देखील बाजार पेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.



शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कमाबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय येथे ही माहिती देण्यात यावी. या योजनेतील लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर अनिवार्य आहे. सध्या बारामती बाजार समितीच्या रेशीम कोष मार्केट मध्ये 100 टक्के ऑनलाईन ई-नाम द्वारे इन्ट्रा मंडी व इंटर स्टेट कोष विक्री लिलाव होत आहेत. याचा फायदा रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना होत असून शेतकऱ्यांना अचुक वजन व योग्य दर व ऑनलाईन पेमेंट मिळत आहे.

बाजार समितीने स्थानिक व कर्नाटक, आंध्र, पश्चिम बंगाल येथील खरेदीदारांना कोष खरेदीचे लायसेन्स अदा केलेले आहेत. भविष्यात बारामती बाजार समिती तेलबिया व गुळ या शेतमालाचे ई-नाम द्वारे लिलाव करण्याचा समितीचा मानस आहे, अशी माहिती समितीचे उपसभापती निलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे. यावेळी बारामती बाजार समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे, बापुराव कोकरे, सतिश जगताप, शुभम ठोंबरे, अरूण सकट तसेच विलास कदम, पणन अधिकारी अजय कुदळे, आदित्य माने आणि बारामती मर्चन्ट असोसिएशचे अध्यक्ष संभाजी किर्वे व व्यापारी निलेश भिंगे, रणजित फराटे, निलेश दोशी आणि कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *