पुणे आयईडी प्रकरणात इसिसच्या दोन फरार संशयितांना अटक, एनआयए ची कारवाई

पुणे, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने 2023 मध्ये पुणे येथे आयईडी तयार करणे आणि त्यांची चाचणी घेणे या प्रकरणात इसिस या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली आहे.

https://x.com/NIA_India/status/1923601657226535301?t=QUn_M-LhkRE86gEALTsYbw&s=19

मुंबई विमानतळावरून दोघांची अटक

अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हाह खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, हे दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथे लपून राहत होते. भारतात परतण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल 2) इमिग्रेशन विभागाने त्यांना अडवले. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

3 लाखांचे बक्षीस जाहीर होते

हे दोघे आरोपी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ फरार होते. त्यांच्या विरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच, या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस एनआयएने जाहीर केले होते.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण पुण्यात अटक करण्यात आलेल्या इसिसच्या स्लीपर मॉड्यूलमधील आठ इतर सदस्यांसह एकत्रित कट रचण्याशी संबंधित आहे. या सर्वांनी भारतात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये घडवून आणण्याचा कट रचला होता. त्यामागे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारून इस्लामिक शासन स्थापन करण्याचा इसिसचा अजेंडा कार्यान्वित करण्याचा उद्देश होता.

अब्दुल्ला शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात हे दोघे स्फोटके तयार करण्याचे काम करत होते. 2022-2023 या कालावधीत त्यांनी तेथे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले होते आणि एका आयईडीचा नियंत्रित स्फोट करून त्याची चाचणीही केली होती.

10 जण अटकेत

या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत एकूण 10 आरोपींविरुद्ध यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले आहे. अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदावाला, शामील नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम यांचा समावेश आहे. तर या प्रकरणाचा सखोल तपास एनआयएकडून सुरू असून, इसिसच्या भारतातील हिंसक आणि राष्ट्रविरोधी कारवायांना उधळून लावण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *