आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! चेन्नई विरुद्ध बंगलोर यांच्यात पहिला सामना

मुंबई, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघात रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले. पाहा आयपीएलचे वेळापत्रक

पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या 21 सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित वेळापत्रक लोकसभा निवडणुकीचा अंदाज घेऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात 22 मार्च रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

यापूर्वीही लोकसभा निवडणूका आणि आयपीएल एकाचवेळी झालेले

याआधी तीनदा आयपीएल स्पर्धा आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा एकाचवेळी आल्या होत्या. 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवली होती. तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा 2 टप्प्यात खेळविण्यात आली होती. त्यावेळी पहिला टप्पा यूएईमध्ये, तर दुसरा टप्पा भारतात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये देखील आयपीएल स्पर्धेच्या कालावधीतच लोकसभा निवडणूक पार पडली होती. त्यावेळी मात्र आयपीएलचे भारतातच आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा देशात लोकसभेच्या निवडणूका असून देखील आयपीएल स्पर्धा पूर्णपणे भारतातच होण्याची शक्यता आहे.

One Comment on “आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! चेन्नई विरुद्ध बंगलोर यांच्यात पहिला सामना”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *