दिल्ली, 11 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोबतच संघातील सर्व खेळाडू इम्पॅक्ट खेळाडूसह सर्वांना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के यातील जी रक्कम कमी असेल तेवढा दंड ठोठावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने षटकांची गती कमी ठेवली होती. दिल्लीच्या संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तिसऱ्यांदा षटकांची गती कमी राखली आहे.
https://twitter.com/ANI/status/1789229985711997365?s=19
बंगळुरू विरूद्धच्या सामन्याला मुकणार
दिल्लीच्या संघाने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात षटकांची गती कमी ठेवली होती. हा सामना 7 मे 2024 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झाला. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतवर पुढील एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याचा फटका दिल्ली कॅपिटल्स संघाला बसणार आहे. कारण, दिल्ली कॅपिटल्सला अजून प्लेऑफ गाठायची आहे. त्यांचे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध महत्वाचे 2 सामने बाकी आहेत. दिल्लीच्या संघाला या दोन्ही सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रिषभ पंतला बंदी घालण्यात आल्यामुळे बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात त्याला खेळता येणार नाही. या महत्त्वाच्या सामन्यांत कर्णधार पंत नसल्यामुळे त्याचा फटका दिल्ली कॅपिटल्स संघाला बसणार आहे. दरम्यान, बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या संघाचे नेतृत्व अक्षर पटेल याच्यावर सोपविण्याची शक्यता आहे.
काय सांगतो नियम?
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, आयपीएलच्या हंगामात एखाद्या संघाने पहिल्यांदा स्लो ओव्हर रेट टाकल्यास त्या संघाच्या कर्णधाराला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. त्याच संघाने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केल्यास संबंधित कर्णधाराला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. जर त्याच संघाने हीच चूक तिसऱ्यांदा केली तर संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदी आणि 30 लाख रुपयांचा दंड होतो. सोबतच संघातील सर्व खेळाडूंना देखील दंड ठोठावला जातो.