आयपीएल 2025: स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!

दिल्ली, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (दि.12) उशिरा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सीमा भागात वाढलेल्या तणावामुळे 9 मे रोजी आयपीएलला एक आठवड्याची स्थगिती देण्यात आली होती. आता स्पर्धेची पुन्हा सुरुवात 17 मेपासून होणार असून अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

https://x.com/ANI/status/1921973166844395661?t=iEJJYqmBk6kTqCXHfDyB1A&s=19

6 ठिकाणी सामने होणार

आता आयपीएलमधील उर्वरित 17 सामने बेंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. प्लेऑफच्या सामन्यांचे स्थळ नंतर जाहीर केले जाणार आहे. या संदर्भातील माहिती बीसीसीआयने दिली आहे.

प्लेऑफच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित
क्वालिफायर 1: 29 मे
एलिमिनेटर: 30 मे
क्वालिफायर 2: 1 जून
अंतिम सामना (फायनल): 3 जून

संपूर्ण आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर एकूण 17 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये दोन डबल हेडर (रविवारी) असून, 13 लीग सामने आणि 4 प्लेऑफ सामने राहिलेले आहेत.

आरसीबी vs केकेआर सामन्याने सुरूवात

स्पर्धेची पुनःसुरुवात 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बेंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्याने होईल. दरम्यान, 8 मे रोजी धर्मशालामध्ये अर्धवट राहिलेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना आता 24 मे रोजी जयपूरमध्ये खेळवला जाईल. जयपूर हे पंजाबचे तात्पुरते होम ग्राउंड असेल. पंजाबला 26 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना देखील जयपूरमध्येच खेळावा लागणार आहे. पूर्वी हा सामना धर्मशालामध्ये नियोजित होता.

पंजाबला फटका बसणार?

शेड्यूलमधील बदलांमुळे पंजाब, चेन्नई आणि हैदराबाद या संघांना त्यांच्या होम ग्राउंडवर सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. चेन्नई आणि हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीबाहेर गेल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे कारण त्यांनी 11 सामन्यांत 15 गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले होते.

परदेशी खेळाडूंना परत आणण्याचे आव्हान

बीसीसीआयने सांगितल्याप्रमाणे, स्पर्धा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सरकार व सुरक्षा यंत्रणांसोबत सखोल चर्चा करण्यात आली. मात्र, आता फ्रँचायझींसमोर सर्वात मोठे आव्हान आहे – परदेशात गेलेल्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला पुन्हा भारतात आणणे. गुजरात टायटन्सवर याचा सर्वात कमी परिणाम झाला आहे, कारण त्यांच्या फक्त दोन परदेशी खेळाडू (बटलर आणि कोएट्झी) बाहेर गेले आहेत आणि उर्वरित संघ अहमदाबादमध्ये सराव करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *