मुंबई, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या आयपीएल पूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. परंतु, त्याच्याआधी 10 संघाच्या फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. त्याची मुदत आज (दि.31) समाप्त होणार आहे. आयपीएलच्या 10 संघाचे फ्रँचायझी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करणार आहेत. यामध्ये संघाचे फ्रँचायझी अनेक दिग्गज खेळाडूंना सोडण्याची शक्यता आहे. यामध्ये रिषभ पंत, केएल राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांसारख्या भारतीय खेळाडूंच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे हे खेळाडू यंदाच्या मेगा लिलावात उतरणार का? याचे उत्तर काहीच वेळात मिळणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या रिटेन्शनची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
https://x.com/IPL/status/1851901320740917306?t=4Q5w9MI4W0tHv6-hykB1EA&s=19
सहा खेळाडू ठेवता येणार
दरम्यान, संघातील खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भात बीसीसीआयने नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार, फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडूंनाच आपल्या संघात कायम ठेवू शकतात. यामध्ये जास्तीत जास्त 5 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. तर हे 5 कॅप्ड खेळाडू भारतीय किंवा परदेशी असू शकतात. सोबतच फ्रँचायझींकडे राईट टू मॅच कार्ड (आरटीएम) चा पर्यायही असणार आहे.
राईट टू मॅच कार्ड (आरटीएम) म्हणजे काय?
राईट टू मॅच कार्डचा नियम हा फ्रँचायझीसाठी एक प्रकारचा चांगला पर्याय आहे. ज्याचा वापर करून ते नुकतेच रिलीज केलेल्या खेळाडूला लिलावामध्ये आपल्या संघात घेऊ शकतात. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात कायम ठेवले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या लिलावात गेला. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पांड्यासाठी राईट टू मॅच कार्डचा पर्याय असेल. समजा, या लिलावात हार्दिक पांड्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने सर्वाधिक बोली 10 कोटी रुपयांची बोली लावली. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला सर्वप्रथम विचारले जाईल की ते आरटीएमचा वापर करणार का? आणि जर मुंबईने त्यावेळी आरटीएमचा वापर केला तर आरसीबीला बोली वाढवण्याची आणखी एक संधी मिळेल. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने ही बोली 18 कोटी रुपयांपर्यंत वाढवली, तर अशा परिस्थितीत मुंबईला आरटीएमचा वापर करून हार्दिक पांड्याला 18 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेण्याची संधी मिळेल. परंतु जर आरसीबीने 10 कोटींच्या पुढे बोली न लावण्याचे ठरवले, तर मुंबई इंडियन्स 10 कोटी रुपयांमध्ये हार्दिक पांड्याला आपल्या संघात ठेवण्यासाठी आरटीएमचा वापर करू शकते.
120 कोटी रुपये खर्च करता येणार!
पुढील महिन्यात आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात अनेक भारतीय तसेच परदेशी खेळाडू सहभागी होणार आहे. दर तीन वर्षांनी आयपीएलचा मेगा लिलाव होत असतो. त्यामुळे या मेगा लिलावाच्या माध्यमातून आयपीएलच्या फ्रँचायझींना आपला संघ मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. यंदा आयपीएलच्या मेगा लिलावात प्रत्येक संघांच्या पर्सची मर्यादा 120 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी पर्सची मर्यादा 100 कोटी रुपये होती.
धोनी अनकॅप्ड खेळाडू?
सोबतच या बैठकीत बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या खेळाडूने गेल्या पाच वर्षात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. अशा खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात महेंद्रसिंह धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसू शकतो. कारण, धोनीने गेल्या 5 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना, एकदिवसीय, टी-20 सामना खेळलेला नाही.