जेद्दाह, 25 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा आज (दि.25) दुसरा दिवस आहे. हा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह याठिकाणी सुरू आहे. काल या लिलावाचा पहिला दिवस पार पडला. या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यापैकी 72 खेळाडू विकले गेले. तर 12 खेळाडूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. न विकल्या गेलेल्या या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, आज या लिलावाचा दुसरा दिवस असून, दुसऱ्या दिवशी 493 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे आजच्या लिलावाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
https://x.com/IPL/status/1860746011377086724?t=JSBTq4q-3t6OeZ3n9X_juA&s=19
https://x.com/IPL/status/1860611895557804330?t=mnZ-qMsM3nSnXv2mEF7eZg&s=19
या भारतीय खेळाडूंवर सर्वाधिक बोली
लिलावाच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले. तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना लिलावात विकत घेतले. तसेच व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांत खरेदी केले. त्यावेळी पंजाब किंग्सने युझवेंद्र चहलला आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंना प्रत्येकी 18 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील केले. त्याचबरोबर जितेश शर्माला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 11 कोटी रुपयांत खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादने इशान किशन किशनला 11.25 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतले.
हे विदेशी खेळाडू झाले मालामाल!
तसेच पहिल्या दिवशी इंग्लंडच्या जोस बटलरला 15.75 कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्सने खरेदी केले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्सने 12.50 कोटी रुपयांत खरेदी केले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सला 12.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला 12.50 कोटी आणि इंग्लंडच्या फिल सॉल्टला 11.50 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला कोलकाता नाईट रायडर्सने 3.60 कोटी रुपयांत खरेदी केले. पंजाब किंग्जने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉईनिस या खेळाडूंना अनुक्रमे 4.2 कोटी रुपये आणि 11 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सहभागी केले.
कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 30.65 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स – 26.10 कोटी रुपये
पंजाब किंग्ज – 22.50 कोटी रुपये
गुजरात टायटन्स – 17.50 कोटी
राजस्थान रॉयल्स – 17.35 कोटी
चेन्नई सुपर किंग्स – 15.60 कोटी रुपये
लखनौ सुपर जायंट्स – 14.85 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स – 13.80 कोटी रुपये
कोलकाता नाइट रायडर्स – 10.05 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद – 5.15 कोटी रुपये