अहमदाबाद, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मध्ये काल रात्री राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेऑफ मधील दुसरे स्थान हुकले. त्यामुळे राजस्थान आता 17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान राजस्थान आणि हैदराबाद संघाचे गुण समान असले तरी हैदराबादचे नेट रनरेट राजस्थान पेक्षा जास्त आहे. तर आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ मध्ये सध्या कोलकाता नाईट रायडर्स 20 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. त्यामुळे प्लेऑफ मधील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
https://twitter.com/IPL/status/1792480267866710156?s=19
या 4 संघांमध्ये सामने
त्यानुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफ मधील क्वालिफायर 1 चा सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवार दि. 21 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात बुधवार दि. 22 मे रोजी एलिमिनेटरमध्ये सामना होणार आहे. हा सामना ही अहमदाबादमध्येच खेळवला जाईल. त्यानंतर शुक्रवार दि. 24 मे रोजी क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर मधील विजेता संघ यांच्यात हा सामना खेळविण्यात येईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
26 मे रोजी फायनल
तर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 26 मे रोजी खेळविण्यात येणार आहे. हा सामना देखील चेन्नईतच खेळवला जाणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये यंदा कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे चार संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये होणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.