चेन्नई, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर हैदराबादने यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आता आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 26 मे रोजी खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ 139 धावा करता आल्या.
https://twitter.com/IPL/status/1794063096824381717?s=19
176 धावांचे लक्ष्य
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने गोलंदाजी करण्याचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यात वेळ वाया घालवला नाही. यावेळी ट्रेंट बोल्टने हैदराबादच्या 3 फलंदाजांना संघाची 57 धावसंख्या असताना माघारी धाडले. हैदराबादची सलामीची जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. यावेळी अभिषेक शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. बोल्टने हैदराबादला पॉवरप्ले मध्येच तीन धक्के दिले. या धक्क्यांमुळे हैदराबाद संघ अडचणीत आला. त्यानंतर हैदराबादच्या हेनरिक क्लासेन आणि शाहबाज अहमद यांनी संघाचा डाव सावरला. या सामन्यात हैदराबाद कडून हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तसेच राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत 37 धावा आणि ट्रॅव्हिस हेडने 28 चेंडूत 34 धावा केल्या. सोबतच शाहबाज अहमदने शेवटी 18 धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांना राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खानने प्रत्येकी 3 तर संदीप शर्माने 2 विकेट घेतल्या.
https://twitter.com/IPL/status/1794069458169766110?s=19
हैदराबादच्या गोलंदाजांची कमाल!
प्रत्युत्तरात 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची पहिली विकेट टॉम कोल्हारच्या रूपाने पडली ज्याने 16 चेंडूत 10 धावांची खेळी केली. या सामन्यात यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन देखील 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. तसेच यावेळी रियान पराग 6 धावा करून बाद झाला आणि हेटमायरने 4 धावांची खेळी केली. या सामन्यात एका बाजूने राजस्थान रॉयल्स संघाच्या विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ध्रुव जुरेलने चांगली फलंदाजी केली. यावेळी त्याने 35 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी केली. मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या सामन्यात हैदराबादकडून शाहबाज अहमदने 3, अभिषेक शर्माने 2, तर कर्णधार पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या कामगिरीमुळे हैदराबादच्या शाहबाज अहमदला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे.