बेंगळुरू, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात बेंगळुरू संघाने चेन्नईवर 27 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बेंगळुरूने आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा बेंगळुरू हा चौथा संघ ठरला आहे. तर दुसरीकडे मात्र या पराभवामुळे चेन्नईचे आयपीएल स्पर्धेतील आव्हान आता समाप्त झाले आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईला शेवटच्या षटकात 17 धावा आवश्यक होत्या. परंतु, त्यांना या षटकात केवळ 7 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईचा संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले होते.
https://twitter.com/RCBTweets/status/1791905702245445973?s=19
चेन्नईपुढे 219 धावांचे आव्हान
तत्पूर्वी, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात 20 षटकांत पाच गडी गमावून 218 धावा केल्या. या सामन्यात पॉवर प्लेच्या पहिल्या तीन षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 31 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर या सामन्यात काही काळ पावसाने व्यत्यय आणला. काही वेळानंतर पुन्हा खेळ सुरू झाला. यावेळी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर विराट कोहली बाद झाला. त्याने 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. बेंगळुरूकडून कर्णधार फाफ डु प्लेसिसने 39 चेंडूत सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. डु प्लेसिस बाद झाल्यावर रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. या सामन्यात रजत पाटीदारने 23 चेंडूत 41 आणि कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत नाबाद 38 धावांची खेळी केली. त्यानंतर दिनेश कार्तिकने 6 चेंडूत 14 आणि ग्लेन मॅक्सवेलने 5 चेंडूत 16 धावा केल्या. त्यामुळे बेंगळुरूला चेन्नईसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवता आले. दरम्यान चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
धोनी जडेजा अयशस्वी
त्यानंतर 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली आणि डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर डेरिल मिशेल केवळ 4 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणेने 33 धावांची खेळी केली. तर रचिन रवींद्र 61 धावांवर असताना धावबाद झाला. या सामन्यात शिवम दुबे फार काही करू शकला नाही. यावेळी त्याने 15 चेंडूत 7 धावा केल्या. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी आक्रमक फलंदाजी करून संघाला प्लेऑफमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते असे करू शकले नाहीत. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने 13 चेंडूत 25 धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजा 22 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. बेंगळुरूतर्फे यश दयाल याने 2 तसेच ग्लेन मॅक्सवेल, सिराज, फर्ग्युसन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.