मुंबई, 15 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर या गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन संशयितांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. यासोबतच पोलिसांनी घटनेत वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1779544640472956959?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1779439734840008975?s=19
https://twitter.com/ANI/status/1779456162674381093?s=19
क्राईम ब्रँचच्या अनेक टीम तपासात व्यस्त
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर या गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच मुंबई क्राईम ब्रँचच्या 10 हून अधिक टीम तपासात गुंतल्या असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात आयपीसी कलम 307 आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या गोळीबाराच्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1779447848469156051?s=19
https://twitter.com/ANI/status/1779455913142669770?s=19
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय म्हणाले?
“ही दुर्दैवी घटना आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. आरोपींना पकडले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्यांनी कायदा हातात घेतला आहे त्यांना सोडले जाणार नाही. सरकार सलमान खानच्या पाठीशी आहे आणि त्यांना काळजी करण्याची गरज नाही.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबई पोलिसांना सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आवश्यक माहिती मिळाल्यावर कळवण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.