पुणे, 06 फेब्रुवारी: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडी आणि कळस येथे केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. बेलवाडी येथील नेचर डिलाईटचे उद्योगपती अर्जुन देसाई आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार मयूर जामदार यांच्या निवासस्थानी तसेच कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या संबंधित ठिकाणी छापे टाकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही कारवाई कोणत्या तपास यंत्रणेने केली? हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या कारवाईमागील नेमके कारण देखील कळू शकलेले नाही. याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
तपास यंत्रणांचे अधिकारी बुधवारी (दि.05) सकाळीच इंदापूर तालुक्यातील बेलवाडी आणि कळस भागात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी अर्जुन देसाई यांच्या घरी छापा टाकून कागदपत्रांची झडती केली. त्याचबरोबर तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी मयूर जामदार यांच्या घरीही अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले आहे. याशिवाय इंदापूर-बारामती मार्गावरील चिखली फाट्याजवळील देसाई हॉस्पिटलमध्येही तपास अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे ही समजते.
या कारवाई दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संबंधित ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली. दरम्यान, या कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास यंत्रणांनी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अधिकृतपणे कोणत्या तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे? हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ही छापेमारी केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ही कारवाई कोणत्या उद्देशाने करण्यात आली? याबाबत इंदापूर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.