बारामती, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो आणि संबंधित संस्थांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापे टाकले असल्याची बातमी समोर आली आहे. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी गेल्या वर्षी रोहित पवार यांच्या विरोधात तपास यंत्रणेने नोटीस जारी केली होती.
दरम्यान, बारामती तालुक्यातील पिंपळे येथे रोहित पवार यांची बारामती अॅग्रो ही कंपनी आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीने छापा टाकला आहे. यावेळी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून आज सकाळपासून त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची छाननी केली जात आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कारवाईनंतर रोहित पवारांचे ट्विट
तपास यंत्रणेच्या या कारवाईनंतर रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी महापुरूषांचा फोटो शेयर केला. “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,” असे रोहित पवारांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.