बाबासाहेबांचा अपमान; जितेंद्र आव्हाडांनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

महाड, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे. मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आज राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील महाड येथे आंदोलन केले. हे आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीच्या पोस्टरवर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यावरून राज्यभरात सध्या निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जाहीर माफी मागितली आहे. तसेच ही कृती अनवधानाने घडली असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यामध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1795766422666354917?s=19

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते.त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो,” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.

अनवधानाने झालेला अवमान जिव्हारी लागलाय: आव्हाड

“गेली अनेक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे. डॉ. बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे. मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही. मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे,” असेही त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1795752330786451575?s=19

भाजपची टीका

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या माफीनाम्यावर भारतीय जनता पार्टीने टीका केली आहे. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत अपमान केला. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडायला भाग पाडले, दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत केले, त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसच्या संगतीने वावरणाऱ्या आव्हाडांनीही आज बाबासाहेबांचा अपमान केला. आता मात्र हे अनावधानानं झालं असं स्पष्टीकरण देतात, पण बाबासाहेबांच्या बाबतीत अशी चूक होऊच शकत नाही. पोटातले बाहेर आले. धिक्कार, जितेंद्र आव्हाडचा धिक्कार. तुम्ही किती ढोंगी आहात हे आज समाजाने पुन्हा एकदा पाहिले,” असे भाजपने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *