स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याबाबतच्या तयारीची बैठक आज, 22 जुलै 2022 रोजी तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी ते बोलत होते. या बैठकीला विविध यंत्रणांचे अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभाग प्रमुख तसेच खाजगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबवावे. तसेच तालुक्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावा, असे पाटील यांनी बैठकीत सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रध्वज वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना राष्ट्रध्वज घरावर फडकविण्यासाठी प्रोत्साहित करावे’. यासह तालुक्याच्या मुख्यालयी 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असेही पाटील यांनी यावेळी सूचित केले.
या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करावे. यासह तालुक्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाची वारसास्थळे देखभालीसाठी ऐतिहासिक वारसा जपवणूक करणाऱ्या संस्थांना दत्तक द्यावीत. तसेच शालेय, महाविद्यालय स्तरावरून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. शासकीय इमारतींवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह लावावे. या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवावी. तालुक्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करावी, असेही तहसिलदार पाटील यांनी बैठकीत सांगितले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व कुटुंबांनी या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा ध्वज अभिमानाने आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहनही तहसिलदार पाटील यांनी केले.