अयोध्या, 22 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आज होणार आहे. यावेळी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. जवळपास 500 वर्षानंतर करोडो देशवासीयांचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. त्यामुळे देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. देशभरात सध्या ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अख्खा देश या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपींना निमंत्रण
भगवान श्री रामाची मूर्ती आज अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुपारी 12:29 ते 12:45 दरम्यान रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यावेळी रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर महापूजा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, अयोध्या नगरी विविध फुलांनी सजून गेली आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सोबतच राम मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधुसंत, राजकारणी, क्रिकेटपटू, अभिनेते, उद्योगपती तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे हे व्हीव्हीआयपी लोक आज अयोध्येत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सध्या याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशभरात आज दिवाळी साजरी होणार!
अयोध्येतील आजच्या सोहळ्यात सर्वांना सहभागी होणे शक्य नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आजच्या दिवशी घरीच राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज घरी रामज्योती लावण्यास सांगितले आहे. त्यामुळे अयोध्येत आज रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने देशभरात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तसेच हा सोहळा पाहता यावा, यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज अर्ध्या दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने देखील आजच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.