आयएनएस इंफाळ भारतीय नोदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयएनएस इंफाळ ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आयएनएस इम्फाळ या युद्धनौकेचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. हा सोहळा मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे पार पडला. यावेळी नौसेना प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाइस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, किरण देशमुख आदी उपस्थित होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1739689991499141483?s=19


आयएनएस इम्फाळ ही पहिली युद्धनौका आहे की, तिला ईशान्येकडील शहराचे नाव देण्यात आले आहे. मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळच्या नावावरून युद्धनौकेचे नाव देण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींनी 2019 मध्ये मान्यता दिली होती. तसेच आयएनएस इंफाळ या युद्धनौकेतील तंत्रज्ञान हे 75 टक्क्यांहून अधिक भारतीय बनावटीचे आहे. यामध्ये भूपृष्ठावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे, स्वदेशी टॉर्पेडो ट्यूब लाँचर, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, 76 मिमी सुपर रॅपिड गन माउंट आणि पाणबुडीविरोधी स्वदेशी रॉकेट लाँचर यांचा समावेश आहे. याशिवाय ही युद्धनौका अण्वस्त्र हल्ला, जैविक हल्ला आणि रासायनिक हल्ला करण्यास देखील सक्षम आहे. आयएनएस इंफाळ या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1739668214546862376?s=19

दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे. “आयएनएस इंफाळचा नौदलाच्या ताफ्यात समावेश हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या आत्मनिर्भरतेचा दाखला आहे. हे आपल्या नौदल उत्कृष्टतेचे आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक आहे. आत्मनिर्भरतेच्या या महत्वपूर्ण टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. आपण सागरी क्षेत्र असेच संरक्षित करत राहू. समुद्र आणि आपले राष्ट्र बळकट करत राहू,” असे पंतप्रधान मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *